*होळीपूर्वी पोलिसांचा मोठा दणका! जिल्ह्यातील ६८५ समाजकंटक हद्दपार*
चंद्रपूर (ता. प्र.)
होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना चंद्रपूर पोलिसांनी जबरदस्त धक्का दिला असून तब्बल ६८५ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा कडक आदेश बजावण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
सणांच्या काळात दहशत माजविणे, सामाजिक सलोखा बिघडविणे आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. “गोंधळ घालाल तर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही” असा स्पष्ट इशाराच या कारवाईतून देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींची माहिती गोळा करून प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर ६८५ इसमांवर हद्दपार आदेश पारित करत पोलिसांनी सणाआधीच गुन्हेगारांची कोंडी केली आहे.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांना तडा जाऊ नये आणि होळी उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा हा कडक आणि निर्धारपूर्ण निर्णय मानला जात आहे.
आता सणाच्या काळात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




