Home आरोग्य आधी वायूप्रदूषण, आता दूषित पाण्याचा कहर!* *शास्त्रीनगरमध्ये पाईपलाईनमधून निघाले सापाचे पिल्लू;...

आधी वायूप्रदूषण, आता दूषित पाण्याचा कहर!* *शास्त्रीनगरमध्ये पाईपलाईनमधून निघाले सापाचे पिल्लू; नागरिकांत संताप**

17

**आधी वायूप्रदूषण, आता दूषित पाण्याचा कहर!*

*शास्त्रीनगरमध्ये पाईपलाईनमधून निघाले सापाचे पिल्लू; नागरिकांत संताप**

घुग्घुस (जि. चंद्रपूर) :
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या घुग्घुस शहरातील नागरिक आधीच वाढत्या वायूप्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. परिसरातील धूळ व औद्योगिक धुरामुळे नागरिकांना श्वसनासंबंधी गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता शहरात दूषित पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

घुग्घुस नगरातील शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक १ येथे गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथील रहिवासी कृष्णा कोंडय्या कादासी (वय ३३) यांच्या घरी नळातून पाणी भरताना पाईपलाईनमधून जिवंत सापाचे पिल्लू थेट बादलीत पडले. ही घटना सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

अचानक सापाचे पिल्लू दिसताच घरातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेबाबत कृष्णा कादासी यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील वेकोली (Western Coalfields Limited) च्या निलजई क्षेत्रात डंपर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते व सन २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब क्वार्टर क्रमांक १६५, शास्त्रीनगर येथे वास्तव्यास आहे.
त्यांच्या मते, संपूर्ण शास्त्रीनगर परिसरात वेकोलीकडून सुमारे ३५ वर्षे जुन्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाईपलाईन अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी, कचरा तसेच कधीकधी विविध जीवजंतूही पाण्यासोबत घरांपर्यंत पोहोचत आहेत.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा पाण्यात किडे, कचरा, दुर्गंधी, चिखल व घाण दिसून येते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने तेच दूषित पाणी पिण्यास व वापरण्यास भाग पडत आहे.

घटनेची माहिती मिळताच वार्ड सदस्य रविश सिंह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत परिसरातील नागरिक व स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर नागरिकांच्या प्रतिनिधीमंडळाने वेकोलीच्या सब एरिया कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले व जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलून स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.

तज्ज्ञांच्या मते दूषित पाण्यामुळे डायरिया, टायफॉईड, हैजा, त्वचारोग तसेच पोटाचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. आधीच वायूप्रदूषणाने त्रस्त असलेल्या घुग्घुस शहरातील नागरिकांसाठी दूषित पाण्याची समस्या आणखी गंभीर ठरत आहे.
नागरिकांनी आरोप केला की वेकोली व्यवस्थापनाला अनेकदा तक्रारी देऊनही पाईपलाईन दुरुस्ती किंवा नवीन पाईपलाईन बसविण्याबाबत ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. लवकरात लवकर समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.