*महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी भरघोस तरतुदी*
*विदर्भास न्याय दिल्याची जनभावना*
*नागपूर, दि. 6* : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक वर्ष 2026-27 साठी आज विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भामध्ये आरोग्य, उद्योग,शिक्षण,पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत नागपूर येथे महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था स्थापन करण्यासोबतच रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करणे, रामटेक विकास आराखडा टप्पा-2 ची कामे करणे, नागपूर ग्रोथ हब उभारणे आणि नागपूर मेट्रोची तिसरी मार्गिका सुरु करणे, नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला न्याय दिल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
‘गडचिरोली स्टिल हब’ द्वारे मोठी गुंतवणूक व रोजगार निर्मिती, चंद्रपूर जिल्ह्यात टिंबर म्युझियम उभारणे, संत गाडगेबाबा तिर्थक्षेत्र सर्किट विकसित करणे, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद, समृद्धी महामार्गाचा विस्तार गडचिरोली पर्यंत करणे, नागपूर-चंद्रपूर शहरांना वाढवण बंदराशी जोडणे, पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्गाची कामे, अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारणे, गडचिरोली विमानतळासाठी भुसंपादन, अमरावती आणि यवतमाळ येथे नाईट लॅडिंग व्यवस्था तसेच अमरावती, अकोला आणि यवतमाळ विमानतळाच्या विस्ताराच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
विदर्भात आरोग्याच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स, आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण आणि संशोधनासाठी नागपूर येथे ‘महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था सहकार्य करणार आहे.
विदर्भातील कलाकारांना प्रोत्साहन व रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. रामटेक शहराच्या सर्वांगिण विकासासाठी रामटेक विकास आराखडा टप्पा-2 ला राबविण्याची बाबही अर्थसंकल्पात नमूद आहे.
मुंबई महानगराच्या धर्तीवर नागपूर ग्रोथ हब विकसित करण्यासोबतच नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र उभारण्याबाबतही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोच्या तिसरी मार्गिका सुरु करण्याबाबतही ठोस तरतूद आहे.
गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. याद्वारे गडचिरोली स्टिल हब म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून 2.61 लाख कोटींची गुंतवणूक आणि 70 हजार 895 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्टिल हब म्हणून गडचिरोलीला विकसित करतांना जैव विविधता संवर्धनासाठी 5 कोटी वृक्ष लागवडीचे लक्षही ठेवण्यात आले आहे. गडचिरोली येथे विमानतळ उभारण्यासाठी भुसंपादन करणे तसेच समृद्धी महामार्गाचा नागपूर पुढे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली असा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर-चंद्रपूर ही शहरे वाढवण बंदराला जोडण्यासाठी तवा-भरवीर माल वाहतून कॉरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गासाठी तरतूद करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सागवान वारशाचे जतन ,संशोधन आणि जनजागृतीसाठी ‘टिंबर म्युझिअम व झायलॅरियम’उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
अमरावती जिल्ह्यासाठीही अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे सर्व कार्यालये एकत्रित आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा यांच्या दिडशे व्या जयंती वर्षा निमित्ताने त्यांचे जन्मस्थळ ,कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान यांना जोडणारे ‘संत गाडगेबाबा तिर्थक्षेत्र सर्किट’ विकसित करण्यात येणार आहे. अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्याबाबत तसेच या विमानतळाच्या विस्ताराच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यवतमाळ विमातळावर नाईट लँडिंगची व्यवस्था आणि अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे.
विदर्भातील सिंचन सुविधांचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या सुमारे ९५ हजार कोटिंच्या महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.




