Home चंद्रपूर शेगाव रोडवर भीषण अपघात : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक, एक जण...

शेगाव रोडवर भीषण अपघात : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक, एक जण ठार, एक गंभीर

9

शेगाव रोडवर भीषण अपघात : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक, एक जण ठार, एक गंभीर

वरोरा, दि. 7 एप्रिल – वरोरा येथून शेगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर पद्मावार राईस मिल जवळ आज सकाळी दहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. विना नंबरच्या ट्रॅक्टर व ट्रॉली वेगातील दुचाकीला समोरासमोर धडकल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महालगाव येथील स्वप्नील बदकी यांच्या मालकीचे महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर व विना नंबर ट्रॉली पद्मावार राईस मिलकडे वळण घेत असताना, वरोराकडून शेगावकडे येणाऱ्या वेगातील दुचाकी (क्र. MH 34 BS 1887) ने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीचा वेग इतका अधिक होता की ती सरळ ट्रॅक्टरच्या समोरील चाकाखाली फसली.

या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी स्वामी मलय्या यमलू (वय ३४, रा. भद्रावती) यांना मृत घोषित केले. तर दुसरा जखमी संतोष राजू पवार (वय १८, रा. भद्रावती) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दुचाकीवरील दोघेही विना हेल्मेट होते. पोलीस पुढील तपास करीत आहेत.