*पत्नीच्या खुनातील आरोपी पतीला जन्मठेप*
*कोठारी पोलिसांच्या तपासाला मोठे यश; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
कोठारी, (वि, प्र): पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आजीवन सश्रम कारावास (जन्मठेप) व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. प्रकाश कदम (DJ-1), चंद्रपूर यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास मौजा कुडेसावली (ता. गोंडपिपरी) येथे घडली होती. आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६० वर्ष) याने पत्नी वंदना धनपाल रामटेके (वय ६० वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय घेत चाकूने वार करून तिची हत्या केली होती. याप्रकरणी फिर्यादी अमर धनपाल रामटेके (वय ३० वर्ष) यांच्या तक्रारीवरून कोठारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास कोठारी पोलीस स्टेशनचे सपोनी श्री. योगेश खरसान यांनी सखोल पद्धतीने करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता श्री. आसिफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे पुरावे तसेच सी.ए. रिपोर्ट यांसारखे सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.
न्यायालयाने भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत आरोपी धनपाल रामटेके यास आजीवन सश्रम कारावास व ३,००० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याच्या तपासात सपोनी श्री. योगेश खरसान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून मपोशि मनीषा गोवर्धन चिवंडे (ब.नं. २८३३) यांनीही मोलाचे योगदान दिले.




