Home क्राईम *अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा मोठा धडक! 52 जनावरांची सुटका; 40 लाखांचा मुद्देमाल...

*अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा मोठा धडक! 52 जनावरांची सुटका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त*

12

*अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांचा मोठा धडक! 52 जनावरांची सुटका; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त*

चंद्रपूर | प्रतिनिधी
गडचांदूर परिसरात गोवंश जनावरांची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 52 जनावरांची सुटका केली असून, सुमारे ₹40 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गडचांदूर पोलीस ठाणे हद्दीतील भोयगाव रोडवर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित ट्रक (क्रमांक CG-04-PQ-7579) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये बैल, गायी व गोरे अशा एकूण 52 गोवंशीय जनावरांना अमानुषरीत्या कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे उघडकीस आले.

धक्कादायक बाब म्हणजे, या जनावरांपैकी 3 जनावरे मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व जनावरांची सुटका केली.

या प्रकरणी सादिक कुरेशी (रा. गडचांदूर) व संबंधित ट्रक चालकांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा 1960, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा 1976 (सुधारित 2015) तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत 52 जनावरे व दोन ट्रक असा एकूण ₹40.40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध जनावर वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.