गॅस तुटवड्यावर हॉटेल असोसिएशन गडचिरोली आक्रमक; अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांचा प्रशासनाला इशारा
फक्त १–२ दिवसांचा साठा शिल्लक;
१९ किलो कमर्शियल सिलेंडर एजन्सीकडे उपलब्ध नाही – हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट
गडचिरोली : कमर्शियल एलपीजी गॅसच्या तुटवड्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील अनेक हॉटेल्सकडे सध्या फक्त एक ते दोन दिवस चालेल एवढाच गॅसचा साठा उरला असल्याची माहिती समोर आली आहे. गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत झाला नाही तर अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा हॉटेल असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने देण्यात आला आहे.
हॉटेल उद्योग हा पूर्णपणे एलपीजी गॅसवर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. गॅस उपलब्ध नसल्यास स्वयंपाक करणे अशक्य होऊन हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील काही गॅस एजन्सीकडे १९ किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची स्थिती असल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे. काही ठिकाणी तर इमर्जन्सी स्टॉकही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर हॉटेल असोसिएशन गडचिरोलीच्या नेतृत्वात हॉटेल व्यावसायिकांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी (ADSO) यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती देण्यात आली. गॅस पुरवठा तातडीने नियमित करण्याची मागणी करत प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी हॉटेल असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष तथा सिटी हार्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंटचे चंद्रकांत पतरंगे यांच्यासह हॉटेल सत्कारचे निखिल बरछा, हॉटेल जलारामचे जग्गू सुचक, हॉटेल रामायणचे पवन सुचक, बाबूजी का ढाबाचे जागेश बिसेन, हॉटेल पूर्णब्रह्मचे समीर वडोदकर, टॉस कॅफेचे मुरारी तिवारी तसेच गुजराती मिठाई घरचे अतुल चांगलानिया हे व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाला सांगितले की, गॅसचा पुरवठा खंडित झाल्यास हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प होईल. त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम हजारो कामगारांवर होईल. स्वयंपाकी, वेटर, साफसफाई कर्मचारी तसेच इतर कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
हॉटेल असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. वरच्या स्तरावरून गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली असून पुरवठा सुरू झाल्यास परिस्थिती पूर्ववत होईल, असेही सांगण्यात आले.
*मुख्य मुद्दे*
जिल्ह्यातील अनेक हॉटेल्सकडे फक्त १–२ दिवसांचा गॅस साठा
१९ किलो कमर्शियल एलपीजी सिलेंडर एजन्सीकडे उपलब्ध नाही
गॅस तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगासमोर मोठे संकट
हॉटेल असोसिएशन गडचिरोलीच्या नेतृत्वात प्रशासनाशी चर्चा
गॅस न मिळाल्यास अनेक हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती



