चार दशकांचा शब्दसाधक – जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी
पत्रकार श्याम आनंद ठेंगडी यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार घोषित
वरोरा : पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचविण्याचे माध्यम नाही ती समाजाचे भान जागविणारी साधना आहे. या साधनेत स्वतःला वाहून घेत आयुष्यभर सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे सूत्र अखंड पेलणाऱ्या पत्रकाराचे नाव आहे श्याम आनंद ठेंगडी. ग्रामीण भागातील पत्रकारितेला प्रतिष्ठेचा, संयमाचा आणि निष्ठेचा गंध देणाऱ्या या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पत्रकारांच्या एकदिवसीय खुले अधिवेशनात जीवन गौरव पुरस्काराने करण्यात येणार आहे . हा सन्मान म्हणजे एका साधकाच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येला मिळालेली समाजमान्यता आहे.
मध्यप्रदेशातील मुलताई हे ठेंगडी यांचे मूळ गाव, तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजुरा येथे २७ डिसेंबर १९५३ रोजी एका सामान्य पण संस्कारमूल्यांनी नटलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घुग्गूस आणि चंद्रपूर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणही चंद्रपूरमध्येच झाले. शिक्षणाच्या काळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून कार्यास प्रारंभ; आणि तेथूनच समाजसेवेचा व्रतस्थ प्रवास सुरू झाला.
१९७१ पासून विद्यार्थी परिषदेत विविध पदांवर काम करताना संघटनकौशल्य, नेतृत्वगुण आणि संवादशक्ती या त्यांच्या कार्यशैलीच्या पायाभूत गोष्टी ठरल्या. ४ जून १९७४ रोजी लोकमान्य कन्या विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांनी कार्याला प्रारंभ केला आणि शिक्षक परिषद व विद्याभारती संस्थांमध्ये जबाबदाऱ्या स्वीकारत शिक्षणक्षेत्रातील निष्ठा प्रकट केली. संघाच्या नगर कार्यवाह पदावर कार्य करताना त्यांनी सामाजिक जाणीवेचे मोल वाढवले.
वरोरा येथे ओम नगर गृहनिर्माण संस्था स्थापन करून बारा वर्षे संस्थापक सचिव म्हणून काम केले. त्याचबरोबर श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थात संचालक व उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी सामाजिक जबाबदारी आणि आर्थिक प्रामाणिकतेचा आदर्श निर्माण केला.
महाविद्यालयीन काळात भारत विजय या साप्ताहिकातून त्यांनी वृत्तलेखनास प्रारंभ केला. शब्दांतील सजगता, निरीक्षणशक्ती आणि तटस्थ दृष्टी या गुणांनी पत्रकारितेची दिशा ठरवली. २७ जुलै १९७९ पासून दैनिक तरुण भारतचे वरोरा तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्याला प्रारंभ केला आणि हा शब्दसाधनेचा प्रवास आज ४७ वर्षांनंतरही तितक्याच निष्ठेने सुरू आहे.
त्यांच्या लेखणीतून असंख्य सामान्यांचे प्रश्न राज्यभर पोहोचले; दुर्लक्षित, विस्मरणात गेलेल्या आवाजांना त्यांनी शब्द दिले. पत्रकारितेचे खरे सौंदर्य त्यांच्या कामातून प्रकर्षाने जाणवते संतुलन, विवेक आणि तथ्याधिष्ठित सादरीकरण.
पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी वरोरा तालुका पत्रकार संघाची स्थापना करून ग्रामीण पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ दिले. आणीबाणी काळात लोकशाही रक्षणासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी निर्भयतेने सहभाग घेतला.
त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघात संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. दोन वेळा श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार, तसेच व्हाईस ऑफ मिडियाचा जीवन गौरव पुरस्कार, जिल्हा व विभागीय उपाध्यक्ष या पदांवरून केलेले कार्य हे सर्व त्यांच्या व्यापक सामाजिक बांधिलकीचे द्योतक आहे.
कॉन्व्हेंट शाळेचे पालक संचालक म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रातही सक्रिय योगदान दिले. १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा कर्मवीर पुरस्कार प्रदान झाला आणि आता राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार ही त्यांच्या दीर्घकालीन पत्रकारितेच्या तपश्चर्येची अधिकृत दखल ठरली आहे.
चार दशकांहून अधिक काळ श्याम ठेंगडी यांनी सत्याचे लेखणीद्वारे रक्षण केले. त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर मूल्यांचे साक्षीदार बनले. त्यांच्या प्रत्येक शब्दात समाजाचा श्वास आहे, आणि प्रत्येक लेखणीच्या टोकावर जबाबदारीची धार आहे.
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वाचा गौरव नाही, तर संपूर्ण ग्रामीण पत्रकारितेच्या अस्मितेचा सन्मान आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास नव्या पत्रकार पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, याबद्दल शंका नाही.
पत्रकारिता म्हणजे सत्याच्या शोधाची अखंड साधना आणि श्याम आनंद ठेंगडी हे त्या साधनेचे जिवंत प्रतीक आहेत.




