*गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख; ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रमातून २३ जणांची शासकीय सेवेत भरारी*
चंद्रपूर | प्रतिनिधी
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देत त्यांना यशाच्या दिशेने नेणारा ‘अम्मा की पढ़ाई’ हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमातून शिक्षण घेतलेल्या तब्बल २३ विद्यार्थ्यांनी विविध शासकीय सेवेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘अम्मा की पढ़ाई’ हा केवळ शिक्षण देणारा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आहे. अनेक अडचणींना सामोरे जात हा उपक्रम उभा राहिला असून आज तो शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे.
या उपक्रमातून १३ विद्यार्थ्यांची पोलीस विभागात नियुक्ती झाली असून, एका विद्यार्थ्याची पोलीस उपनिरीक्षक तर दोन विद्यार्थ्यांची कर निरीक्षक पदावर निवड झाली आहे. इतर विद्यार्थीही विविध शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
कार्यक्रमाला विनय गौडा (माजी जिल्हाधिकारी), वसुमना पंत (जिल्हाधिकारी), सुदर्शन मुमक्का (पोलीस अधीक्षक), रविंद्र शिंदे, डॉ. विजय आंईचावर, निलेश ताजने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आमदार जोरगेवार यांनी आपल्या भाषणात वैयक्तिक अनुभव सांगताना नमूद केले की, दहावीनंतर पुढील शिक्षण घेता न आल्याची खंत त्यांना आजही आहे. त्या वेदनेतूनच ‘अम्मा की पढ़ाई’ हा उपक्रम सुरू झाला असून, गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
या केंद्रात तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, नियमित चाचण्या, मुलाखत तयारी आणि शारीरिक चाचणीचे प्रशिक्षण अशा सर्व सुविधा निशुल्क दिल्या जातात. यशस्वी विद्यार्थ्यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते
यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच वैदेही लोहिया हिला एमबीबीएस शिक्षणात गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांनी ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याचे सांगितले.
*जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निरोप*
कार्यक्रमात ‘अम्मा की पढ़ाई’ ट्रस्टच्या वतीने माजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा निरोप समारंभही पार पडला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा करण्यात आली. जनतेसाठी सहज उपलब्ध असणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.




