Home चंद्रपूर चंद्रपूर RTO चेकपोस्टवर लाचखोरीचा पर्दाफाश; ACB चा सापळा यशस्वी

चंद्रपूर RTO चेकपोस्टवर लाचखोरीचा पर्दाफाश; ACB चा सापळा यशस्वी

11

📰 चंद्रपूर RTO चेकपोस्टवर लाचखोरीचा पर्दाफाश; ACB चा सापळा यशस्वी
चंद्रपूर (प्रतिनिधी) –
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने लक्कडकोट आरटीओ चेकपोस्टवर सोमवारी केलेल्या सापळा कारवाईत ५०० रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहात पकडून भ्रष्टाचाराच्या साखळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात संबंधित मोटार वाहन निरीक्षकाच्या संगनमताचा गंभीर आरोप समोर आला असून, दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
तक्रारदार असलेल्या ४७ वर्षीय ट्रकचालकाकडून ‘एन्ट्री’च्या नावाखाली वारंवार पैसे उकळले जात असल्याची तक्रार २० मार्च रोजी नागपूर येथील ACB कार्यालयात दाखल करण्यात आली होती. पडताळणीत ही बाब खरी ठरल्याने ACB पथकाने २३ मार्च रोजी सापळा रचला.
सदर कारवाईदरम्यान एजंट विलास देशमुख याने पंचासमक्ष ५०० रुपयांची लाच स्वीकारली. तपासात मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांचे या गैरप्रकारात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कारवाईची चाहूल लागताच दोन्ही आरोपी पळून गेले. मात्र पोलिसांनी केलेल्या झडतीत ‘एन्ट्री’च्या नावाखाली गोळा केलेली ७,१२० रुपयांची रोकड, सापळ्यातील रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध सुरु आहे.
🔴 ठळक मुद्दे
तक्रारदार : ४७ वर्षीय ट्रक चालक
लाच रक्कम : ₹५००
ठिकाण : लक्कडकोट RTO चेकपोस्ट
जप्ती : ₹७,१२० रोख + मोबाईल
आरोपी : एजंट + मोटार वाहन निरीक्षक
स्थिती : दोन्ही आरोपी फरार