Home चंद्रपूर *काँग्रेसला मोठा धक्का : वारजूरकर बंधूंचा भाजपात प्रवेश*

*काँग्रेसला मोठा धक्का : वारजूरकर बंधूंचा भाजपात प्रवेश*

10

*काँग्रेसला मोठा धक्का : वारजूरकर बंधूंचा भाजपात प्रवेश*

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर तसेच शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश सतीश वारजूरकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडला. या वेळी चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांचे मार्गदर्शन लाभले.

काँग्रेसमधील वाढती गटबाजी, सामान्य कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच पक्षाचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर होत असल्याचे आरोप करीत वारजूरकर बंधूंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपले राजीनामे पाठवले होते. तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सतीश वारजूरकर यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. अविनाश वारजूरकर आणि सतीश वारजूरकर यांनी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषद अध्यक्षपद, आमदारकी तसेच खनिज प्रतिष्ठान महामंडळाचे अध्यक्षपद अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

काही महिन्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असताना वारजूरकर बंधूंचा भाजपातील प्रवेश हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, आगामी निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.