Home चंद्रपूर विठ्ठल मंदिर प्रभागात विकासपर्वाची दमदार नांदी; “मी महापौर नाही, तुमची सेवक” –...

विठ्ठल मंदिर प्रभागात विकासपर्वाची दमदार नांदी; “मी महापौर नाही, तुमची सेवक” – संगिताताई खांडेकर* *उपमहापौर प्रशांत दानव यांची विकासाची ग्वाही • भव्य सत्कार सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

35

चंद्रपूर : सई स्वयं सहाय्यता महिला बचत गट, मथुरा शारदोत्सव मंडळ आणि चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या भव्य सत्कार सोहळ्याने विठ्ठल मंदिर प्रभागात विकासाच्या नव्या पर्वाची आश्वासक सुरुवात झाल्याची भावना निर्माण झाली. दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मथुरा चौक येथे झालेला हा सोहळा उत्साह, जल्लोष आणि नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला.

सत्कारमूर्ती म्हणून चंद्रपूरच्या प्रथम नागरिक महापौर संगिताताई राजेंद्र खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, नवनिर्वाचित नगरसेवक भालचंद्र दानव तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती निर्मला कोतपल्लीवर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मंचावर चंद्रपूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद टेकुलवार, कोषाध्यक्ष गजानन क्षिरसागर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर टेकुलवार, सचिव छगन पडगेलवर, उदय अंभीरवार, सई स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा नंदाताई गर्गेलवार, वैशाली पिल्लेवाड, मथुरा शारदोत्सव मंडळचे अजय कोतपल्लीवर, प्रवेश गर्गेलवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक नंदाताई गर्गेलवार यांनी केले, तर ओजस्वी सूत्रसंचालन राजेश सोलापन यांनी पार पाडले.

यावेळी महापौर संगिताताई खांडेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट शब्दांत सांगितले,
“पद मोठं असलं तरी माझ्यासाठी नागरिकच सर्वश्रेष्ठ आहेत. मी महापौर नाही तर तुमची सेवक आहे. विठ्ठल मंदिर प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहीन.”

त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली.
उपमहापौर प्रशांत दानव यांनी महापौरांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही देत महिलांच्या सन्मान व सुरक्षेसाठी कायम भाऊ म्हणून उभा राहण्याची भावना व्यक्त केली.
नगरसेवक भालचंद्र दानव यांनीही प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कामकाज आणि नागरिकांशी सतत संवाद हीच आपली प्राथमिकता असेल, असा ठाम निर्धार व्यक्त केला.

महिलांची लक्षणीय उपस्थिती, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद यामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. या भव्य सत्कार सोहळ्याने विठ्ठल मंदिर प्रभागात विकास, सेवा आणि विश्वासाची मजबूत पायाभरणी झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे