Home चंद्रपूर पाच हजार लावण्यांचा जल्लोष; जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर चंद्रपूर

पाच हजार लावण्यांचा जल्लोष; जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर चंद्रपूर

12

* पाच हजार लावण्यांचा जल्लोष; जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर चंद्रपूर*

चंद्रपूर : मराठमोळ्या संस्कृतीचा जागतिक डंका वाजविण्यासाठी उत्कृष्ट महिला मंच, चंद्रपूर यांच्या वतीने एक भव्य आणि ऐतिहासिक उपक्रम हाती घेण्यात आला असून तब्बल पाच हजार महिला व मुलींच्या सहभागातून सलग वीस मिनिटांत वीस लावण्या सादर करून Guinness Book of World Records मध्ये नाव नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

हा भव्य सोहळा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी चांदा क्लब ग्राउंड येथे सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला जागतिक व्यासपीठ मिळवून देणे, नव्या पिढीत या पारंपरिक नृत्यप्रकाराबद्दल अभिमान निर्माण करणे आणि मराठी भाषा-संस्कृतीचा गौरव वाढवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

उत्कृष्ट महिला मंच गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तीकरण, सांस्कृतिक जतन, सामाजिक जनजागृती, युवा कौशल्य विकास आणि समाजातील एकता वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. महिलांच्या भक्कम सहभागातून उभा राहणारा हा जागतिक विक्रम सोहळा मंचाच्या कार्याचा नवा मैलाचा दगड ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे, तर दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता चांदा क्लब ग्राउंड येथे रंगीत तालीम पार पडणार आहे.

अध्यक्ष छबुताई वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम अहोरात्र परिश्रम घेत असून या उपक्रमासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंगजी आंबटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.