SSCET येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
भद्रावती : श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (SSCET), भद्रावती येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे व सुरक्षित वाहन चालविण्याचे महत्त्व पटवून देणे हा होता.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून वाहतूक निरीक्षक लाखे साहेब व त्यांच्या टीमची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रस्ते अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहन चालविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सुरक्षित वाहतुकीची शपथ घेतली. यावेळी रस्ता सुरक्षा विषयक पोस्टर प्रदर्शन व जनजागृती संदेशांचे सादरीकरण करण्यात आले. “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापन सदस्य अमित येरगुडे, अभिषेक येरगुडे तसेच प्रा. रोहिणीका येरगुडे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गोरांटीवार यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित समाज निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले. NSS सेल प्रमुख प्रा. प्रणय पिंपळकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS विभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.




