शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल -चंद्रपाल चौकसे
शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे – शा.राजेंद्र बावनकुळे
“अबकी बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार” – कवी वाकुडकर

नागपूर,ता.७ जूलै
भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात पार पडला. शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे. शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे उदगार काढत चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात अप्रत्यक्षपणे उमेदवारीची घोषणा केली.

कामठीच्या राम जानकी सभागृहात विदर्भ स्तरीय भव्य सांस्कृतिक मेळावा हजारोच्या संख्येच्या उपस्थित घेण्यात आला. यावेळी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तूमाने कार्यक्रमात उपस्थित नसल्याने कलावंतात नाराजीचा सूर होता. कलावंतांना मिळणाऱ्या मानधनात वाढ होण्याची अपेक्षा होती आणि इतर मागणीची पूर्तता करण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शाहीर कलाकार मंडळी या आशेने मेळाव्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणे त्यांच्या पदरी निराशा पडली.

यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की (दि.२०) डिसेंबर २०२२ हिवाळी अधिवेशना दरम्यान शाहीर कलाकारांच्या मोर्चा काढण्यात आला होता. सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी मागण्या पूर्ण करू, पण आतापर्यंत एकही मागणी त्यांनी पूर्ण नाही केली. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करून तुटपुंज्या मानधन मध्ये वाढ करण्यात यावी. अशी विनंती शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी केली.

भारत राष्ट्र समिती विदर्भ प्रमुख कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी सरपंच झाल्या बायका, शाहिरी गीत म्हणून प्रेक्षक यांना मंत्र मुग्ध केले. यावेळी सांगितले की, तेलंगणा सरकार शाहीर कलाकार यांना महाराष्ट्र सरकार पेक्षा जास्त मानधन देत आहे. “अब की बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार” तुमच्या पूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू असे आश्वासन वाकुडकर यांनी दिले.







