‘रामधाम’येथे ७५ जोडप्यांचे ‘शुभमंगलम’
कन्हान,ता.२७ एप्रिल
जिल्ह्यातील मनसर येथे प्रसिद्ध ‘रामधाम’ तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यात गोरगरीब वर-वधूचे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येतात.

या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे सहकार्य लाभते.

यावर्षी ७५ गरीब वर-वधुंचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने पार पडले. सन २००५ पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पाडल्या जात आहेत. आतापर्यंत सुमारे १२६६ जोडप्यांचे “शुभमंगलम” रामधाम येथे झाले आहे. यावर्षी ७५ गरीब वर-वधुंचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.

जि.प. शाळेतून सर्व ७५ नवरदेवांना ट्रेलरवर बसवून डी.जे, बँड, आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत त्यांची सामूहिकरित्या वरात काढण्यात आली. त्यानंतर हिंदू, बौद्ध व आदिवासी समाजाच्या रितिरिवाजाने ७५ जोडपे विवाहबंधनात अडकले.





