चंद्रपूर महापालिकेतील राजकारण सध्या ‘‘काय चाललंय?ङ्कङ्क या प्रश्नाभोवतीच फिरत आहे. निवडणुका होऊन निकाल लागल्यानंतर नागरिकांना स्थैर्य, दिशा आणि विकासाची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या दालनात विकासाच्या फाईलीपेक्षा आकड्यांच्या वहीत अधिक पानं उलटली जात असल्याचं चित्र दिसून आलं. गट नोंदणी, अंतर्गत मतभेद, वेगवेगळे दावे आणि पडद्यामागच्या चर्चाया साèयामुळे सत्तेचं चित्र धुसर झालं होतं. काहींनी या संभ्रमाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी स्वतःला निर्णायक समजत राजकीय शड्डू ठोकले. मात्र राजकारणात नेहमीच आवाज करणारेच शेवटी निर्णय घेतात असं नसतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे.
संख्याबळ हेच राजकारणाचं अंतिम सत्य असतं आणि जेव्हा ते शिस्तबद्धपणे एकत्र येतं, तेव्हा अनेक स्वप्नं आपोआपच कोसळतात. काही दिवसांपूर्वी ज्यांना सत्ता आपल्या मुठीत असल्याचा भास होत होता, त्यांच्यासाठी वास्तव अधिक कठोर ठरत आहे. महापालिकेतील सत्तासमीकरण हळूहळू स्थिर होत असून, धुरळा बसल्यानंतर चित्र स्पष्ट होत चाललं आहे.
या साèया खेळीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न मात्र दुर्लक्षित राहतोयनागरिकांचा. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि प्रदूषण यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं अद्यापही फाईलमध्येच अडकलेली आहेत. सत्तेसाठी चाललेल्या खेळात विकासाचा डाव मात्र वारंवार बाजूला पडतोय, हीच खरी शोकांतिका आहे.
आता सत्तेचं गणित जवळपास स्पष्ट होत असताना, अपेक्षा एवढीच की खुर्ची मिळाल्यानंतर राजकारण संपावं आणि प्रशासन सुरू व्हावं. कारण नागरिकांनी मतदान केलं ते आकड्यांची करामत पाहण्यासाठी नव्हे, तर शहर पुढे जावं म्हणून. धुरळा बसतोय पण आरशात दिसणारं प्रतिबिंब विकासाचं असेल, हीच चंद्रपूरकरांची अपेक्षा.




