Home विदर्भ गडचिरोली *सात बालकांचे पुनर्वसन पूर्ण; विशेष दत्तक संस्थेचा अभिमानास्पद टप्पा*

*सात बालकांचे पुनर्वसन पूर्ण; विशेष दत्तक संस्थेचा अभिमानास्पद टप्पा*

137

*सात बालकांचे पुनर्वसन पूर्ण; विशेष दत्तक संस्थेचा अभिमानास्पद टप्पा*

*विशेष दत्तक संस्था, गडचिरोली येथे ७ व्या बालकाचा दत्तक विधान सोहळा संपन्न*

गडचिरोली (वि. प्र.)
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित विशेष दत्तक संस्था, बजरंग नगर (हनुमान मंदिराच्या मागे), गडचिरोली येथे एका अनाथ बालकाचा दत्तक विधान सोहळा अत्यंत भावनिक व हृदयस्पर्शी वातावरणात संपन्न झाला.

निराधारतेच्या अंधारातून प्रेम, सुरक्षितता आणि मायेच्या उज्ज्वल भविष्यात वाटचाल करणाऱ्या या चिमुकल्याच्या जीवनप्रवासातील हा नवा टप्पा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

जन्मानंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे पालकांपासून दूर झालेल्या या बालकाचे संस्थेमार्फत जिव्हाळ्याने संगोपन करण्यात आले. संस्थेतील आया, अधिपरिचारिका व कर्मचारी वर्गाने मातृत्वाच्या भावनेने त्याची काळजी घेतली. योग्य आरोग्यसेवा, संतुलित आहार, वेळेवर लसीकरण तसेच प्रेमळ वातावरणात बालकाची सर्वांगीण वाढ सुनिश्चित करण्यात आली. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे आज त्या बालकाला कायदेशीर व कायमस्वरूपी कुटुंब प्राप्त झाले.

या सोहळ्यात सौ. ज्योति कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या हस्ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बालकाचे दत्तक पालकांकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी त्यांनी दत्तक प्रक्रियेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, दत्तक ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून एका बालकाला आयुष्यभरासाठी कुटुंब, ओळख व सुरक्षितता देणारी सामाजिक बांधिलकी आहे. तसेच नव्या पालकांना बालकाच्या आहार, स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी, वेळेवर लसीकरण व भावनिक विकासाबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सौ. वर्षा मनवर (अध्यक्षा, बालकल्याण समिती), श्री. दिनेश बोरकुटे (सदस्य, बालकल्याण समिती), श्री. अविनाश गुरनुले (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), श्री. महेश रणदिवे (अधिक्षक, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह /बालगृह, गडचिरोली), संस्थेचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम चौधरी, अधीक्षक श्री. नशिब जांभुळकर, अधिपरिचारिका कु. डिम्पल सहारे तसेच संस्थेतील सर्व आया व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

बालकल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली यांच्या समन्वयातून संपूर्ण दत्तक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आतापर्यंत सात बालकांना कायमस्वरूपी कुटुंब लाभले असून हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.

या सोहळ्यामुळे समाजात दत्तक प्रक्रियेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून निराधार बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेष दत्तक संस्था, गडचिरोली ही संस्था बालकांच्या संरक्षण, संगोपन व पुनर्वसनासाठी सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अनेक बालकांच्या आयुष्यात आनंदाचे किरण फुलविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.