Home चंद्रपूर कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी; पाच सुरक्षा रक्षकांनचे निलंबन वेकोलीतील...

कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी; पाच सुरक्षा रक्षकांनचे निलंबन वेकोलीतील प्रकार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

12

कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी; पाच सुरक्षा रक्षकांनचे निलंबन

वेकोलीतील प्रकार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस
वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वरोरा: तालुका प्रतिनिधी

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) अंतर्गत माजरी परिसरातील वरोरा -एकोना उपप्रादेशिक कोळसा खाण क्रमांक २ मधून मोठ्या प्रमाणात कोळसा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी घडली असून, वेकोली मार्फत वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वेकोलीच्या महाव्यव्यवस्थापक राकेश प्रसाद यांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील निष्काळजीपणाबद्दल पाच सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या रक्षकांमध्ये संदेश बेलेकर, गोकुळ डंभारे, शंकर बोबडे, लव पारखी आणि मनोज माथनकर यांचा समावेश आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदींमधील अनियमिततेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, वि. वि. ट्रान्सपोर्ट कंपनी, नागपूर या कंपनीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खाण परिसरातून कोळशाने भरलेल्या अवस्थेत बाहेर पडताना सुरक्षा रक्षकाच्या उपस्थितीतही वजन न करता (वेट न करता) आपोआप बॅरियर ओलांडला. याची पुनरावृत्ती दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दुसऱ्या नंबरच्या ट्रक ने केली.

या संशयास्पद हालचाली लक्षात येत cuanto डिस्पॅच ऑफिसर मुकेश गजभिये यांनी सतर्कता दाखवत महाव्यवस्थापक राकेश प्रसाद यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता ही चोरीची घटना असल्याची पुष्टी झाली. महाव्यवस्थापकांच्या आदेशानुसार, प्रादेशिक सुरक्षा अधिकारी एस.के. बैरवा यांनी ४ मार्च रोजी वरोरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

या कोळशाचा पुरवठा आवरपूर सिमेंट कंपनीसाठी असल्याची माहिती मिळाली आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर संबंधित कंपनीला याबाबत कळवून कोळसा पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला आहे.
दक्षता विभागाकडून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापक राकेश प्रसाद यांनी सांगितले. “डिस्पॅच ऑफिसरच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली. आम्ही डब्ल्यूसीएल मुख्यालयाला कळवले आहे. दक्षता विभागाचे पथक या सर्व बाबींची चौकशी करेल. यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांचीही चौकशी करून कोणालाही सोडले जाणार नाही,” असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

एकोना माईन्स अधिकाऱ्यांनी ४ तारखेला लेखी तक्रार दिली असल्याचे सांगितले. वृत्त लिहेपर्यंत पोलीस स्टेशन वरोरा येथे एफ आय आर नोंदवली गेली नव्हती.

बाक्स

ओमप्रकाश सोनटक्के पोलीस निरीक्षक, वरोरा
विकोलीच्या एकोना कोळसा खाणी मधून बिगर काटा करता कोळशाचे ट्रक बाहेर जात असल्याचे लेखी तक्रार पोलीस स्टेशन वरोराला प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल.
—————-