*जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘महाराजस्व समाधान शिबीर अभियान’चा शुभारंभ*
*अजयपूर (ता. चंद्रपूर) येथे आयोजन; सुमारे ६०० नागरिकांची उपस्थिती*
चंद्रपूर, दि. ७ : शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि.७) अजयपूर (ता. चंद्रपूर) येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जगताप, तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी माने, उपअधीक्षक भूमी अभिलेख गिज्जेवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, राजू धांडे तसेच अजयपूर व चिचपल्लीचे सरपंच उपस्थित होते.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले की, नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. शासनाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि कोणीही वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विविध विभागांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यांच्या शंकांचे निरसन केले. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या मंडळस्तरीय महसूल शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह जवळपास ६०० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट
महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या दैनंदिन समस्या व तक्रारींचे त्वरित निराकरण
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींबाबत जनजागृती
महसूल सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर
शासनाच्या विविध सुधारित धोरणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे
*या सेवांचा लाभ उपलब्ध*
भोगवटदार वर्ग २ जमिनींची तपासणी करून पात्र प्रकरणे वर्ग १ मध्ये रूपांतर व अद्ययावत ७/१२ वितरण
सर्व गावांमध्ये ७/१२ वाचन करून प्रलंबित नोंदींची दुरुस्ती
पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून मंजुरी आदेश वितरण
तुकडेबंदी कायद्यांतर्गत जमीन व्यवहारांची नोंदणी व अद्ययावत ७/१२ वाटप
७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे व डिजिटल ७/१२ व ८अ उतारे उपलब्ध करून देणे
विद्यार्थ्यांचे अर्ज संकलित करून प्रमाणपत्रांचे वितरण
पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतींना देणे
पात्र लाभार्थ्यांना घरपट्टे वाटप
लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी/अधिवास, जात, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र वाटप
ई-मोजणी, अग्रीस्टॅक, पीएम किसान योजना व तक्रार निवारण सेवा




