*गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; विविध दाखल्यांचे वाटप*
राजुरा : महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची सुरुवात शनिवारी (दि.७ मार्च) राजुरा तालुक्यातील मौजा गोवरी येथे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शिबिराला अचानक भेट देत आढावा घेतला. शिबिरात नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांनी प्रास्ताविकातून अभियानाचा उद्देश व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची माहिती दिली. विविध विभागांच्या प्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.
शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेश, नवीन रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच वर्ग-१ करण्यात आलेल्या जमिनीचे ७/१२ उतारे आणि दुरुस्ती केलेले ७/१२ उतारे लाभार्थींना प्रत्यक्ष देण्यात आले. विविध शासकीय योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास गट विकास अधिकारी भागवत रेजीवाड, उपअधीक्षक भूमिअभिलेख दत्तू सोनवणे, पशुधन विकास अधिकारी तेलंगे, नायब तहसीलदार श्रीमती पवार, तसेच गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्यासह शेजारील ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढई, बंधू कोडापे, वनमाला कातकर, पांडुरंग पोटे आदी उपस्थित होते.
तसेच गोवरी मंडळातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.




