Home आरोग्य ‘उजास’ तर्फे ‘आशा’ सेविकांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून समुदाय-केंद्रित मासिक पाळी आरोग्याला चालना

‘उजास’ तर्फे ‘आशा’ सेविकांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून समुदाय-केंद्रित मासिक पाळी आरोग्याला चालना

14

‘उजास’ तर्फे ‘आशा’ सेविकांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून समुदाय-केंद्रित मासिक पाळी आरोग्याला चालना

चंद्रपूर, ३१ मार्च, २०२६ : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा भाग असलेली ‘उजास’ संस्था मासिक पाळीच्या शाश्वत आरोग्य व्यवस्थापनासाठी आपली कटिबद्धता अधिक दृढ करत असून समुदाय- केंद्रित परिणामाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून चंद्रपूर येथील हनुमान मंदिर हॉलमध्ये ‘पीरियड मेळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मासिक पाळीच्या आरोग्याविषयी जागरूकता आणि वर्तणुकीत बदल घडविण्याच्या दृष्टीने तळागाळात क्षमता निर्माण करण्याकरिता या मेळाव्यात ३७१ ‘आशा’ सेविका आणि १० अधिकारी एकत्र आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा मिशन व्यवस्थापक शीतल गर्गिलवार, जिल्हा मिशन व्यवस्थापक श्री. प्रवीण भांडारकर, गट आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मेनूश्वर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना माडवी, गट मिशन व्यवस्थापक श्री. राजेश दुधे आणि समुदाय संघटक श्री. रोहिदास राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समुदाय-केंद्रित आरोग्य जागरूकता मोहिमेत आघाडीच्या सेविकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी यावेळी भर दिला.

हा उपक्रम जागरूकता-आधारित उपक्रमांकडून क्षमताबांधणीच्या दृष्टिकोनाकडे वळत असून त्यामध्ये ‘आशा’ सेविकांना आपापल्या समुदायांमध्ये माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्य समर्थक म्हणून काम करण्यास सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात उपस्थितांना मासिक पाळीच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंध, सुरक्षित पद्धती आणि खोलवर रुजलेले गैरसमज व निषिद्ध गोष्टींना सामोरे जाण्याविषयी व्यावहारिक ज्ञान देण्यात आले. जेणेकरून तळागाळातील महिला आणि किशोरवयीन मुलींपर्यंत अचूक माहिती पोहोचेल.

या ‘पीरियड मेळा’ची रचना संवादात्मक शिक्षणाचा अनुभव म्हणून करण्यात आली असून यामध्ये माहितीपूर्ण स्टॉल्स, मासिक पाळीच्या उत्पादनांविषयी जागरूकता सत्रे आणि खेळ, योग व मार्गदर्शित चर्चा यांसारख्या सहभागात्मक उपक्रमांचा समावेश होता. यातून खुल्या सहभागाला प्रोत्साहन मिळाले, त्यातून पारंपरिकरित्या कलंकित मानल्या जाणाऱ्या विषयावरील संवादांना सामान्य स्वरूप मिळण्यास मदत झाली.

यावेळी ‘आशा’ सेविकांनी प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित मोलाची माहिती दिली. सांस्कृतिक निषिद्धता आणि जागृतीचा अभाव अजूनही कायम असल्याचे यातून अधोरेखित झाले. भाग्यश्री भोईर म्हणाल्या, “मी लहान असताना मासिक पाळीच्या काळात अनेक निर्बंध असायचे. आजही अनेक मुली आणि महिलांना अशाच आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, ‘उजास’च्या उपक्रमांमुळे मुली मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत आणि प्रश्न विचारू लागल्या आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर गैरसमजांबाबत अशा आणखी सत्रांची गरज आहे.”

‘आशा’ कार्यकर्त्या अर्चना उराडे पुढे म्हणाल्या, “पहिल्या मासिक पाळीनंतर अनेक मुलींना त्यामागील कारणे माहीत नसतानाही निर्बंधांचा सामना करावा लागतो. मुली आणि त्यांचे कुटुंबीय या दोघांनाही स्पष्ट आणि अचूक माहिती देण्याची गरज आहे.”

जिल्हा पातळीवरील आव्हानांवर प्रकाश टाकताना जिल्हा मिशन व्यवस्थापक श्री. प्रवीण भांडारकर यांनी काही विशिष्ट भागांमधील ‘कुरमा घर’ पद्धतीसारख्या प्रथांकडे लक्ष वेधले. त्यांचा आजही महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे, आणि यातून सातत्यपूर्ण सामुदायिक सहभागाची गरज अधोरेखित झाली.

या उपक्रमाच्या धोरणात्मक दिशेची माहिती देताना ‘उजास‘च्या प्रमुख पूनम पाटकर म्हणाल्या, “निव्वळ जनजागृतीकडून मासिक पाळीच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी एक शाश्वत परिसंस्था उभारण्याकडे ‘उजास’ची उत्क्रांती होत आहे. ‘आशा‘ सेविकांच्या कार्यकर्त्यांच्या क्षमतेमध्ये गुंतवणूक करून, आम्ही सातत्यपूर्ण आणि स्थानिक बदल घडवून आणू शकणाऱ्या कुशल सामुदायिक आरोग्य समर्थकांचे एक नेटवर्क उभारत आहोत. या मॉडेलमधून विस्तारक्षमता आणि दीर्घकालीन शाश्वतता यांची सुनिश्चिती होते, तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवण्यास मदत होते.

विस्तारक्षम आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत मॉडेल्सद्वारे मासिक पाळीच्या आरोग्याला दैनंदिन सामुदायिक आरोग्य संवादाचा भाग बनवण्याच्या उजासच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब या उपक्रमात पडले आहे. ‘आशा’ सेविकांनी परिवर्तनाचे दूत म्हणून कार्य करावे, या आवाहनाने कार्यक्रमाचा समारोप झाला — यात प्रवादांना आव्हान देणे, स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या समुदायांमध्ये माहितीपूर्ण संवादाला चालना देणे यांचा समावेश आहे.