*टायगर सफारी प्रकल्पाला गती देण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांची नागपूरात धडाकेबाज बैठक; ६०० कोटींच्या प्रकल्पाला लवकर मंजुरीची अपेक्षा*
चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रोडवरील वन अकादमीजवळ प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी टायगर सफारी व रेस्क्यू सेंटर प्रकल्पाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा सक्रिय पाठपुरावा करत नागपूर येथील वन भवनात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी तसेच वनबल प्रमुख एम. एस. राव यांच्यासोबत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय परवानग्या यावर सखोल चर्चा झाली.
आमदार जोरगेवार यांनी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या बाबींचा पाठपुरावा वेगाने करण्याची ठाम मागणी केली. विशेषतः केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची अंतिम मंजुरी, केंद्र सरकारकडील प्रक्रियेतील टप्पे आणि निधी वितरण यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करत आमदार जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी टायगर सफारीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले असून, लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सुमारे ६०० कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प असून, त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेडकडे देण्यात आली आहे. यापूर्वीही आमदार जोरगेवार यांनी वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडून प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला होता.
विशेष म्हणजे, प्रकल्पाच्या दर्जेदार अंमलबजावणीसाठी आमदार जोरगेवार यांनी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करत आराखड्याचा अभ्यास केला असून, दिल्लीतील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाशीही थेट चर्चा केली आहे.
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच वन्यजीव संवर्धन, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. वाढत्या वाघांच्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू सेंटर उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी आणि सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी ठाम भूमिका आमदार जोरगेवार यांनी यावेळी मांडली.




