*घुग्घुस येथील राजीव रतन चौक पुलाच्या कामाची आ. किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी*
*९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण; पुल लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश*
घुग्घुस(ता.प्र.) येथील राजीव रतन चौकात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. पुलाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून सध्या पॅचवर्क, अंतिम टप्प्यातील तांत्रिक कामे तसेच काही किरकोळ कामे शिल्लक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करून पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश राजनकर, वणी वेकोली एरियाचे मुख्य महाप्रबंधक करमरकर, महारेलचे श्रीकांत पंचवटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोड, भाजपचे घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, गटनेत्या मीना मोरपाका, नगरसेवक विवेक बोढे, आशिष मासिरकर, गणेश पिंपळकर, राजू रेड्डी, नगरसेविका वैशाली ढवस, आशा पानघाटे, पल्लवी घुले, सुनीता पेंदोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य, सुरक्षा उपाययोजना, वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा तसेच कामाची सद्यस्थिती याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
चंद्रपूर मतदारसंघात विकासकामांचा वेग कायम ठेवत नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हा पुल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना सुरक्षित, जलद व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी पुलावरील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देत ट्रायल प्रक्रियेदरम्यान सर्व तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भविष्यात परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*वेकोली अधिकारी व व्यापारी मंडळासह लोहा पुलाची पाहणी*
यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील लोहा पुलाचीही वेकोली अधिकारी, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांसह पाहणी केली. हा पुल सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील रहदारी अधिक सुलभ व सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
पुलाचे काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावे तसेच कामामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले. यावेळी वेकोलीचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




