*मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; आपत्ती काळात सूक्ष्म नियोजनावर भर : जिल्हाधिकारी वसुमना पंत*
*पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष • नियंत्रण कक्ष, प्रशिक्षित पथके व आपत्कालीन सुविधा तयार ठेवण्याचे निर्देश*
चंद्रपूर, दि. १३ : आपत्तीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी सर्व विभागांनी मूलभूत सुविधा, साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच मान्सूनदरम्यान उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी-२०२६ आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, निलिमा मंडपे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंत यांनी सर्व विभागांना उपलब्ध साधनसामग्रीची तपासणी करून ती कार्यस्थितीत ठेवण्याचे निर्देश दिले. जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणी करणे, धोकादायक इमारती, पूल व रस्त्यांची तपासणी करून तातडीने दुरुस्तीचे नियोजन करणे, अवैध होर्डिंग्ज हटविणे तसेच स्वयंसेवकांना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला.
आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफ (NDRF) व एसडीआरएफ (SDRF) यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जलद प्रतिसाद पथके, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन संपर्क यंत्रणा आणि जनजागृती मोहिमा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, दुर्गम भागात आपत्ती उद्भवल्यास मदत, पुनर्वसन व अन्नधान्य पुरवठा तातडीने पोहोचला पाहिजे.
वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, इरईसह इतर नद्यांमुळे जिल्ह्यातील काही गावांना पुराचा धोका संभवत असल्याने सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. पूरप्रवण गावांमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक साहित्यांची तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीत आरोग्य विभागाकडून औषधसाठा, सर्पदंश उपचार व लसींची उपलब्धता, पोलीस विभागाकडून प्रशिक्षित मनुष्यबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते व पुलांची दुरुस्ती, जलसंधारण विभागाकडून नाले व बंधाऱ्यांची स्वच्छता, लघु पाटबंधारे विभागाकडून धरणे व कालव्यांची देखभाल, महावितरणकडून वीजवाहिन्यांची तपासणी तसेच कृषी विभागाकडून बियाणे, खते व पेरणीपूर्व मार्गदर्शनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर अहवाल सादर केला. बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.




