Home चंद्रपूर चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा कधी मिळणार?* *मा. नितीन गडकरी पडोली ते...

चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा कधी मिळणार?* *मा. नितीन गडकरी पडोली ते बंगाली कॅम्प उड्डाणपूल मंजूर करून चंद्रपूरकरांना दिलासा देणार का?*

38

*चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा कधी मिळणार?*

*मा. नितीन गडकरी पडोली ते बंगाली कॅम्प उड्डाणपूल मंजूर करून चंद्रपूरकरांना दिलासा देणार का?*

चंद्रपूर(वि.प्र.)शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जटपुरा गेट असो किंवा शहरातील प्रमुख चौक, सर्वत्र वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर शहरातून दररोज सुमारे दोन ते तीन हजार वाहने तेलंगणा, हैदराबाद, मूल, बल्लारशाह, राजुरा, अहेरी, आलापल्ली, गोंडपिंपरी तसेच बंगाली कॅम्प, गांधी चौक आणि जनता महाविद्यालय परिसराकडे ये-जा करतात. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड ताण निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे.

पडोली ते बंगाली कॅम्प दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने होत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे अनेक वेळा निवेदने सादर करून या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मा. नितीन गडकरी यांचे विदर्भाशी आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याशी जुने नाते आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले गडकरी यांना चंद्रपूरच्या समस्या चांगल्याप्रकारे परिचित आहेत. त्यामुळे चंद्रपूरकरांच्या अपेक्षा त्यांच्याकडून अधिक आहेत.
पडोली ते बंगाली कॅम्प उड्डाणपूल उभारण्यात आल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. जड वाहने शहरात न येता थेट मार्गक्रमण करू शकतील.

परिणामी वाहतुकीचा वेग वाढेल, अपघातांचे प्रमाण कमी होईल तसेच दररोज हजारो लिटर पेट्रोल व डिझेलची बचत होईल. पर्यावरणीय प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल.

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी पडोली ते बंगाली कॅम्प उड्डाणपूल अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मा. नितीन गडकरी यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देऊन चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

फोटो कॅप्शन :
पडोली ते बंगाली कॅम्प उड्डाणपूलाची मागणी पुन्हा ऐरणीवर; वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी चंद्रपूरकरांच्या नजरा केंद्र सरकारकडे.