‘त्या’ वनपरिक्षेत्र अधिकार्यावर बडतर्फीची कारवाई कधी होणार ?
केवळ वेतन थांबवून दिली सुट, मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी
पत्रपरिषदेत नगरसेवक जितेश कुळमेथे यांची माहिती
(.प्र.) / ३ जून
चंद्रपूर : सामाजिक वनीकरण विभागातील अभिसरण योजनेच्या कामामध्ये झालेल्या गंभीर आर्थिक अनियमितता आणि शासकीय नियमांचे उल्लंघन सिध्द झाल्यानंतरही संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस.इंगळे यांच्यावर बडतर्फीेची कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ वेतन थांबवून गरीब मजुरांच्या हक्काच्या पैशाचे गभन करणार्या या अधिकार्याला पाठीशी घालण्याचाच हा प्रकार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करणारे पत्र देण्यात आल्याची माहिती नगरसेवक जितेश कुळमेथे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस. इंगळे यांनी महसूल व वनविभागातर्पेâ राबविण्यात येणार्या अभिसरण योजनेअंतर्गत जॉबकार्डधारक मजुरांना मजुरीची रक्कम पुर्णपणे दिली नव्हती. त्यामुळे मजुरांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला होता. सदर रक्कम ३० लाख रुपयाची असतांना वनपरिक्षेत्राधिकार्याकडून वसूलीच्या नावाखाली केवळ १ लाख ११ हजार ६२३ एवढीच रक्कम वसूल करण्यात आली. परंतू बाकीच्या रकमेबाबत वनविभागाचे अधिकारी तोंडावर बोट ठेवून आहेत. तसेच या अधिकार्याने शासकिय नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही त्यांना बडतर्फ न करता केवळ त्यांचे तात्पूरते वेतन अडविण्यात आल्यामुळे सदर भ्रष्टाचारवर वनविभागाचे अधिकारी खतपाणी घालून इंगळे यांना वाचवित असल्याचे निदर्शनास आले आहे. चौकशीअंती r जी एस इंगळे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अतर्गत शिथा सुनावण्यात आली असली तरी ती कारवाई अत्यंत सौम्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्यस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, जी. एस. इंगळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सेवेतून बडतर्फीसह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच त्या कालावधीत जबाबदार असलेल्या सर्व अधिकार्यार्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा जनतेमध्ये प्रशासनाविषयी चुकीचा संदेश जाईल असा इशाराही नगरसेवक जितेश कुळमेथे यांनी पत्रपरिषदेत केला. यावेळी विजय कुमरे, डॉ. देव कन्नाके, प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम व निकेश गोडे यांची उपस्थिती होती.




