Home चंद्रपूर होळीच्या दिवशी महसूल मंत्र्यांच्या दारात संघर्षाचा गुलाल उधळणार!” – भाई जगदीश कुमार...

होळीच्या दिवशी महसूल मंत्र्यांच्या दारात संघर्षाचा गुलाल उधळणार!” – भाई जगदीश कुमार इंगळे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

17


होळीच्या दिवशी महसूल मंत्र्यांच्या दारात संघर्षाचा गुलाल उधळणार!”
– भाई जगदीश कुमार इंगळे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
चंद्रपूर:
विदर्भातील भूमिहीन आणि शेती प्रश्नांसाठी लढा देणारे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी राज्य सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. ‘सर्वांसाठी शेती’ हे धोरण तात्काळ घोषित करावे आणि वर्षानुवर्षांची शेतीची अतिक्रमणे नियमित करावीत, या प्रमुख मागणीसाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी होळीच्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर भव्य धरणे आंदोलन करणार असल्याचे इंगळे यांनी आज जाहीर केले.
पत्रकार परिषदेत बोलताना भाई जगदीश कुमार इंगळे म्हणाले की, “सरकारने संघटनेच्या मागणी प्रमाणे ‘सर्वांसाठी घरे’:२०२२ चे धोरण घोषित करून निवासी अतिक्रमण धारकांना हक्काची घरे दिली, मग ‘सर्वांसाठी शेती’ चे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमीत करण्यासाठी विलंब का ? असा प्रश्न उपस्थित करून गायरान आणि सरकारी जमिनींवर पिढ्यानपिढ्या कष्ट करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावावर आजही सातबारा नाही. हे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे, प्रत्यक्षात गरिबांना जमिनीचा मालकी हक्क देण्यास टाळाटाळ करत आहे.”
आंदोलनाचे प्रमुख मुद्दे:
विदर्भाची वज्रमूठ: या आंदोलनात नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळसह विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांतील भूमिहीन शेतकरी सहभागी होणार आहेत.
होळीचा सण आंदोलनात: जेव्हा राज्य होळीच्या आनंदात असेल, तेव्हा हक्काच्या जमिनीसाठी भूमिहीन शेतकरी मंत्र्यांच्या दारात अनवाणी उभे राहतील.
धोरणात्मक मागणी: शेतीची अतिक्रमणे नियमित करण्याचा ठोस शासन निर्णय (GR) निर्गमित झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
भाई जगदीश कुमार इंगळे यांनी इशारा दिला आहे की, जर महसूल मंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर भविष्यात हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल. “आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहोत,” अशा शब्दांत सरकारचा समाचार घेतला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतल्यास विदर्भासहित राज्यातील लाखो बिगर सातबारा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असा विश्वास भाई जगदीश कुमार इंगळे यांनी व्यक्त केला यावेळी शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे व क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आदिवासी गोंड समाज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा माणिकराव शेडमाके यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा घोषित केला